पिंपरी चिंचवड : महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राच्या बाहेर देखील गणेशोत्सव साजरा करण्याची वेगवेगळी परंपरा आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी देशातील विविध धर्म तथा जाती पंथाचे लोक एकत्र येत असतात, आणि आपापल्या पद्धतीने हा उत्सव साजरा करीत असतात. पिंपरी चिंचवड येथील वाकडमधील क्रिस्टल हाईट्स सोसायटीमध्ये देखील असाच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गणरायाला सोसायटीच्या सभासदांकडून घरी बनवलेल्या विविध अशा ५६ पदार्थांचा भोग चढवण्यात आला.
पिंपरी चिंचवड हे तसे कॉस्मोपॉलिटन शहर, त्यातल्या त्यात वाकड परिसरामध्ये देशातील विविध भागांमधून कामासाठी आलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. वाकड भागातील सोसायट्यांमध्ये देखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या भागामध्ये देशातील कानोकोपऱ्यातून आलेले लोक हा उत्सव मराठी बांधवांसोबत साजरा करतात. यावेळी आपल्या देशाच्या एकात्मतेची मोठी साक्ष जगाला मिळते.
याच पद्धतीने वाकड येथील क्रिस्टल हाईट्स सोसायटीमध्ये देखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी १० दिवस सोसायटीकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अंताक्षरी, फायरलेस कुकिंग, क्वीझ आणि स्पेल बी, लहान मुले तसेच महिला वर्गासाठी विविध खेळ स्पर्धा, Dumb Charades, कराओके व म्युझिकल नाईट, फॅशन शो, लहान मुलांसाठी चित्रकला असे विविध उपक्रम घेण्यात आले. गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी सोसायटीमधील महिलांकडून गणरायाला ५६ पदार्थांचा भोग चढवण्यात आला. यामध्ये देशातील विविध भागांमध्ये बनवल्या जाणाऱ्या प्रसिद्ध पदार्थांचा समावेश होता. त्याच बरोबर गणेशोत्सवानिमित्त महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते, त्याचा आस्वाद सोसायटीमधील सर्व सभासदांनी घेतला.