सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

पुण्यात उभे राहतेय मेट्रोचे जाळे, पिंपरी चिंचवडकरांना मात्र ठेंगा

डिजिटल पुणे    27-08-2023 10:11:05

पिंपरी चिंचवड : गेल्या १५ वर्षांमध्ये पुण्यासोबतच सर्वात मोठी वाढ व विस्तार होणारे शहर म्हणून पिंपरी चिंचवड उदयास आले. या ठिकाणी औद्योगिक प्रकल्पासोबत पुण्यातील सर्वात मोठे हिंजेवाडी आयटी पार्क निर्माण झाले. त्यामुळे खऱ्या अर्थाने जगाचे लक्ष पिंपरी चिंचवडकडे गेले. त्यामुळे देशभरातून या शहरामध्ये नोकऱ्यांसाठी तरुणांचा ओघ वाढू लागला. पिंपरी चिंचवड शहरासोबत आजूबाजूला म्हणजेच हिंजेवाडी, मारुंजी, रावेत, किवळे, मोशी, चाकण, तळेगाव सोबतच भोसरी परिसरामध्ये मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प तयार झाले. पिंपरी चिंचवडच्या लोकसंख्येत देखील गेल्या १५ वर्षामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

    मात्र या वाढणाऱ्या लोकसंख्येला व औद्योगिक विस्ताराला शहरामध्ये सामावून घेण्यासाठी ज्या पायाभूत सुविधा निर्माण होणे गरजेचे होते त्या मात्र कधीच मिळू शकल्या नाहीत. आज शेजारी पुण्यामध्ये पाहिले तर मेट्रोचे मोठे जाळे निर्माण होत असताना दिसत आहे. सध्या जरी या मेट्रोचा वापर पुणेकर पर्यटनासाठी करीत असले तरी भविष्यात सर्व जोडवाहिन्या पूर्ण झाल्यानंतर त्याची दैनंदिन उपयोगिता लक्षात येईल. आता या मेट्रोच्या दुसऱ्या विस्तारित प्रस्तावालादेखील पुणे महानगरपालिकेने मंजुरी देऊन हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. यामध्ये चांदणी चौक ते वाघोली, खडकवासला ते खराडी आणि पौड फाटा ते माणिकबाग, सिंहगड रोड (वारजे मार्गे) अशा नवीन विस्तारित मार्गाला मान्यता मिळाली आहे. खाली दिलेला नकाशा पाहिल्यास यामध्ये पुण्याचा बराचसा भाग व्यापलेला दिसतो.

    आता पिंपरी चिंचवडच्या मेट्रोच्याबाबतीत बोलायचे झाल्यास यामध्ये पिंपरी चिंचवडकरांना तोंडाला फक्त पाने पुसल्याचे स्पष्ट लक्षात येते. शहरातील स्थानिक नेते शहरामध्ये मेट्रो आणल्याचे कितीही श्रेय घेत असले तरी या मेट्रोचा पिंपरी चिंचवडकरांना फक्त पुण्यात जाण्यासाठीच उपयोग होणार असल्याचे दिसते. मग ती पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट असो वा हिंजेवाडी ते शिवाजीनगर. पिंपरी चिंचवड शहराभोवती पसरलेल्या लोकसंख्येला या मेट्रोचा फक्त वीकेंडला पुण्यात खरेदीला जाण्यासाठीच वापर होईल. पिंपरी चिंचवड शहरातून मग ते निगडी, आकुर्डी, चिंचवड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, रावेत, किवळे, तळेगाव, तळवडे, चाकण, मोशी येथून रोज हिंजेवाडीकडे जाणारे लाखो लोक आहेत, त्यांना याचा काहीच फायदा होणार नाही आहे. तसेच भोसरी, चाकण, तळेगाव अशा औद्योगिक ठिकाणी कामाला जाणाराही मोठा वर्गही शहरात आहे, त्यांना देखील याचा काही फायदा होणार नाही आहे. मग ही मेट्रो आणली कोणासाठी? उगाच आपल्या शहरातून मेट्रो फक्त धावली म्हणून त्याचा उदो उदो करणे कितपत योग्य ठरते? या मेट्रोच्या पुढील विस्तारामध्ये तरी शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा विचार करणार आहेत का? असे प्रश्न इथे उपस्थित होतात. तिकडे पुणे महानगरपालिकेने पुढाकार घेऊन नवीन विस्तारित मार्गांचा प्रस्ताव मान्य करून राज्य शासनाला पाठवला, पिंपरी चिंचवड पालिकेने पीसीएमसी ते निगडी सोडले तर अशा कोणत्या विस्तारित मार्गांचा विचार केलाय? खरे तर चाकण - निगडी मार्गे सध्या तयार होणाऱ्या वाकड पर्यंत व चाकण- मोशी मार्गे सध्याच्या भोसरी स्टेशन पर्यंत असे किमान दोन मार्ग तरी महानगरपालिकेने प्रस्तावित केले पाहिजेत. त्यानंतर या प्रस्तावित मार्गांना रावेत-किवळे पासून वाकड पर्यंत तसेच रावेत-किवळे पासून निगडी पर्यंत आणि वाकड पासून पिंपळे सौदागर मार्गे सध्याच्या भोसरी स्टेशनपर्यंत असा विस्ताराच्या प्रस्तावावर महानगरपालिकेने विचार केला पाहिजे. 

    इथे हिंजेवाडीमधील कस्तुरी चौकातील १०० मी. रस्ता करण्यास महापालिकेला २ महिने लागत आहेत, भूमकर चौकातील ट्राफिकचा प्रश्न अजून सुटलेला नाही, वाकड - बालेवाडी पूल अर्धवट राहिला आहे, वाकड येथील सेवा रस्त्यांचे प्रश्न अजून प्रलंबित आहेत. वाकड - हिंजेवाडी पुलाखाली अनेक प्रवासी जीव मुठीत धरून उभे असतात, त्यांच्यासाठी साधा बसथांबा देखील नाही आहे. मात्र असे अनेक प्रश्न दुर्लक्षित करून जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून जाणारी मेट्रो मात्र कुतुहलाचा विषय बनून राहिली आहे. काही दिवसांपूर्वी तर पिंपळे सौदागर इथे पोस्ट ऑफिस मंजूर झाले याचे श्रेय लाटण्यात येथील नेत्यांची धावपळ दिसून आली. ईमेल आणि व्हॉट्सअपच्या जमान्यात हे नेते पोस्ट ऑफिस सुरु केल्याचा श्रेयवाद करतात? मान्य आहे पोस्ट ऑफिसचा अजूनही बऱ्याच ठिकाणी उपयोग होतो, पण किती तो श्रेयवाद?

    पिंपरी चिंचवड शहरात फक्त मेट्रोचाच मुद्दा नाही तर शहरामध्ये  एकाही ठिकाणी बहुमजली कार पार्किंग नाही आहे. त्यामुळे या वाढलेल्या लोकसंख्येच्या गाड्या रस्त्यावरच उभ्या रहात आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या नावाखाली अरुंद झालेले रस्ते या बेशिस्त पार्किंगमुळे अजूनच व्यापले गेले आहेत. इतक्या मोठ्या शहरामध्ये साधी एक समर्पित पार्किंग व्यवस्था असू नये? शेजारच्या पुण्यामध्ये मंडई, शगुण चौक, बालगंधर्व अशा अनेक ठिकाणी बऱ्याच आधीपासून अशा पार्किंगची निर्मिती करण्यात आली होती. पुण्यातही काही ट्राफिक आणि बेशिस्त पार्किंग नाही असे नाही, मात्र तेथे त्यावर पर्याय असणाऱ्या गोष्टींचा विचार होऊन त्या अस्तित्वात तरी आल्या. मात्र पिंपरी चिंचवड मात्र राजकारणामध्येच गुरफटलेले शहर राहिले. कधीकाळी सर्वात श्रीमंत महानगरपालिका, परफेक्ट टाउनप्लॅनिंग असे बिरुद मिरवणाऱ्या शहराची सध्याची स्थिती पाहिली तर कीव येथे. असे असूनही शहराच्या विकासासाठी, अस्तित्वात असणारे रस्ते फोडून नवीन करणे या पलीकडे फारच कमी विकासाच्या गोष्टी झाल्याचे दिसते. हा विकास निगडी येथील उड्डाणपूल व काही भागातील उद्याने इत्यादी पर्यंत मर्यादित होता. 

    पुढील वर्षी लोकसभा, विधानसभेसोबतच महापालिकेच्या निवडणुकीचे देखील बिगूल वाजणार आहे. त्यामुळे गेली ६-७ वर्षे आपल्याला क्वचितच दिसणारी नेते मंडळी सणासुदीच्या निमित्ताने बाहेर पडताना दिसतील, नवनवीन आश्वासनांच्या खिरापती वाटताना दिसतील. आपण पिंपरी चिंचवडचे सुज्ञ नागरिक बनून आपल्या दैनंदिन समस्यांचा पाढा यांच्यासमोर मांडून जर त्यांच्या डोक्यावर बसलो नाही तर मात्र आपली पुढची पिढी आपल्याला भविष्यात येणाऱ्या मोठ्या आणि न सुटणाऱ्या समस्यांसाठी नक्कीच जबाबदार धरणार हे नक्की.

    आपल्याला हा लेख कसा वाटला, आपल्या परिसरामध्ये देखील अश्याच समस्या असल्यास कमेंट करा व हा लेख पुढे शेअर करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया

Digital Pune
vijay chavan
 27-08-2023 13:33:58

excellent

 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती