सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

गोष्ट आमच्या लग्नाची; पुण्यातील सौ. डॉ. मोनाली हर्षे यांनी सांगितलं हा प्रसंग आठवण्या मागचं कारण

डिजिटल पुणे    12-04-2024 12:26:07

गोष्ट  म्हंटली की ती जर सुरस, रंजक असेल तर अविस्मरणीय होते. आमच्याही चहा पोहे कार्यक्रमाने ठरवून झालेल्या लग्नाची गोष्ट अशीच अविस्मरणीय ठरली एका गंमतशीर प्रसंगाने 

आमचं लग्न ठरलं डिसेंबर मध्ये आणि मुहूर्त मात्र धरायचा होता उन्हाळी सु‌ट्टीत में मध्ये. पुण्यासारख्या ठिकाणी सन दोनहजार दोन मध्येही कार्यालय मिळणं कठीण होतं. जवळजवळ दहा एक महिने आधी तरी बुकिंग करून ठेवायला लागायची आम्हालाही हवं ते कुठलंच कार्यालय मिळेना. हळूहळू आई-वडिलांना जरा त्याचा ताण यायला लागला. पण जर नशिबात असेल तर आपोआपच प्रश्न सुटतात. तिसर्‌या दिवशी मंगल कार्यालय वाल्यांचाच फोन आला. दुसऱ्या कोणीतरी घरगुती अपरिहार्य कारणाने लग्नाचे बुकिंग रद्द केलेलं होतं. आम्हालाही तो दिवस चालणार होता. मुहूर्तवेळ, वार, ठिकाण ठरल्यावर त्याप्रमाणे पत्रिका छापायल्या, बोलावणी झाली. सहा महिने हाताशी असूनही खरेदी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत चालू होती. तसा हुंडा घेणार्यातले या देणार्यातलेही कोणी नव्हते. आम्ही दोघेही डॉक्टर होणार होतो. 

नवरा एक वर्ष पुढे. मी त्याच्या मागे एक वर्ष. पण तरीही हौसेला मोल नाही' म्हणतात त्याचा प्रत्यय रोज येत होता. बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. घाणा भरणे, हळद वगैरे विधी चालू झाले. सासरकडून आलेली साडी नेसून पूजा करायची म्हणून मला मैत्रिणी तयार करू लागल्या, आणि समोरच्या आरशातून मला माझा मामा जरा चिंताक्रांत चेहर्याने खोलीत आलेला दिसला. लगबगिने जसा आला तसा तो आईच्या कानात काहीतरी फुसफुसून गेला. जागरण होऊनही इतका वेळ आनंदी, उत्साही असलेल्या आईच्या चेहऱ्याचाही रंग बदलला.ती सुद्धा घाई घाई त्याच्या मागे बाहेर पडली. आता मात्र माझी उत्सुकता जरा काळजीयुक्त भीतीमध्ये बदलली, नक्की काय चालू आहे. 

बघण्याकरीता मी त्यांच्या मागे बाहेर गेले. खोली बाहेरच एक सत्तरीतल्या वृद्ध बाई लालेलाल चेह‌ऱ्याने आईवर शाब्दिक फैरी झाडत होत्या. "नमू आत्या मेली नाही म्हणावं त्याला बोलवायचं नव्हतं तर ऐनवेळी फोन तरी कशाला करायचा? एक दिवस आधी कोणी कळवलं का घरच्यांना? नातीचं लग्न ठरवलेलंही सांगितलं नाही तुझ्या नवर्याने. एवढ्‌या लांब सावंतवाडीहून पोहोचले एका दिवसात. दमछाक झाली अगदी. त्यात विनायकचीही काही मदत होत नाही माहित नाही का तुम्हाला?" आता माझं लक्ष त्या विनायक नावाच्या चाळीशीतल्या मतिमंद दिसणाऱ्या व्यक्तीकडे, म्हणजे त्यांच्या मुलाकडे गेलं. आईने हातानेच त्यांना खुर्चीत बसून पाणी प्यायला लावलं आणि ती त्या शांत होण्याची वाट पाहत बसली. हे सगळं माझ्या लग्नात घडत असल्याने प्रसंग सावरण्याची अलिखित जबाबदारी आपली असल्याचा साक्षात्कार झाल्याने मी पुढे झाले आणि त्या आजीचा हात हातात घेऊन त्यांना म्हटलं," आल्याआजी राग सोडा आता. मला नवीन आयुष्यासाठी आशीर्वाद नाही का देणार? सगळ्यांतर्फे मी तुमची माफी मागते. "आणि त्यांच्या पायावर मी डोकं ठेवलं. संस्कार अंगात भिनलेल्या त्या आजींनीही मला आशीर्वाद दिला. इतक्यात घाबऱ्या चेहऱ्याने दोन अनोळखी पुरुष मंडळी आत आली आणि त्या नमुआत्त्याची माफी मागू लागली. झालं होतं असं की, आमचं लग्न होतं पहिल्या मजल्यावर आणि दुसऱ्या मजल्यावरही दुसरंच लग्न होतं. ज्या यजमानांच्या त्या आल्या होत्या. भल्या पहाटे बाहेर नावांचे बोर्ड लागलेले नव्हते. गैरसमज कळल्यावर खजील होऊन आर्जीनी आईची माफी मागितली आणि त्या दुसऱ्या मजल्याकडे निघाल्या. आपल्या मुलीच्या लग्नात उगीच कुठलाच अपप्रसंग होऊ नये म्हणून आईने मुकाट्‌याने अनोळखी आर्जीचं ऐकून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

 माझी आई आहेच समजूतदार प्रेमळा हा प्रसंग आठवण्याचं कारण म्हणजे, मागच्याच आठवड्‌यात माझ्‌या सासूबाईची सत्तरी साजरी झाली त्या त्यांच्या मैत्रिणीला सांगताना मी ऐकलं," सुलभा, मी तेंव्हाच ह्यांना म्हटलं होतं, ही मुलगी सगळं घर नीट सांभाळेल. अगं यांच्या लग्नात ओळख-देख नसलेल्या आजीचा ओरडा हिच्या आईनंही ऐकून घेतला आणि हीनंही त्यांची माफी मागून टाकली. तेंव्हाच मी ओळखलं, मुलगी समंजस दिसते. बघ गाडी कशी छान रुळावर आहे वीस वर्ष."

माझ्या आणि सासूबाईच्या नात्याची सुरुवातच त्यांच्या माझ्याबद्दलच्या सकारात्मक मानसिकतेने झाल्याने त्यांनी मला खुल्या दिलाने स्वीकारलं. त्यामुळे मलाही नवीन घरी रुळण्यामध्ये अडचणी फारशा आल्या नाहीत. आमचं नातं निकोप, निरोगी झालं. अगदी माझ्या मैत्रिणींना हेवा वाटावा असं. अशीही आमच्या लग्नाची सामान्य पण संस्मरणीय गोष्ट.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती