सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

गोष्ट आमच्या लग्राची; गुजरातमधील संगीता निशिकांत देशपांडे यांनी सांगितल्या लग्नाच्या गोड आठवणी

डिजिटल पुणे    17-04-2024 11:04:11

आज खूप दिवसांनी जुन्या आठवणी ताज्या झाल्या . माझ्या लग्राला 34 वर्षे पुर्ण झाले आहेत. नक्कीच ह्या आठवणी माझ्या साठी नेहमी ताज्याच असणार आहेत व भूतकाळात शिरायला मला आवडेल.

SNDT कॉलेज पुणे येथे माझे शिक्षण झाले. त्या नंतर एका नामांकित इन्स्टिटयूट मध्ये एक वर्षाचा कॅनिंग चा कोर्स केला व एकीकडे नोकरी शोधणे चालू होते. लग्राचा विषय कधीच मनात आला नव्हता. कारण ही तसेच होते वडील वेटर्नरी सर्जन एका नामांकित कंपनी मध्ये नोकरी करत होते, दोन मोठे भाऊ एक इंजिनिअर व दुसरा वकील तेही नोकरी करत होते. आईची नोकरी तर एकदम भारी होती. पुर्ण वेळ गृहिणी ची, सगळ्यात अवघड अशी, घरी शिक्षणाचे व नोकरीचे वातावरण होते. नोकरी साठी प्रयत्न चालू होते. आजूबाजूच्या आईच्या मैत्रिणी आईला म्हणायच्या की हीचं नाव नोंदव लग्र ठरायला वेळ लागतो.

हो नाही करता करता आई अनुरूप संस्थेमध्ये गेली फॉर्म भरायला. जातांना एक मोठ्या आकाराचा माडीतला फोटो न्यायचा होता, तेव्हा मी साडी खुपच कमी वेळा नेसायचे, नेहमी स्कर्ट, पंजाबी ड्रेस, शर्ट पेंन्ट असेच कापडे असायचे.

आमच्या कॉलेज च्या वार्षिक संमेलनासाठी मी व माझी खास मैत्रीण अंजली कुलकर्णी साड्या नेसून गेलो होतो, तीने माझी व मी तिची. नंतर आम्ही कलासागर फोटो स्टुडिओ मध्ये जावुन फोटो पण काढला होता. तोच एक फोटो माझ्या कडे होता.

आई तो फोटो घेवुन संस्थेत गेली सर्व माहिती भरली व बाहेर यायला निघाली तेवढ्यात तिला एका महिलेचा मोठ्याने बोलण्याचा आवाज आला, त्या महिला त्यांच्या भावाची माहिती कोणाला तरी सांगत होत्या, आईने ते ऐकले व ती त्यांच्या जवळ गेली, ओळख झाली, माहितीची देवाणघेवाण झाली व आई घरी आली.

साधारण दोन तीन दिवसांनी त्या महिलेचा फोन आला की आम्ही मुलगी बघायला येतोय, मग काय गोंधळ च उडाला, घर आवरायचं, साडी कोणती नेसायची, चहा बिस्कीटं द्यायची की पोहे करायचे? शेवटी पोहे व चहा दोन्ही ठरले. दोन दिवसांनी चार जणं आले भेटायला, एक लग्नाचा मुलगा, ती महिला, एक पुरुष व साधारण आजीच्या वयाच्या एक महिला असे चौघे.

घरच्यांची ओळख आईने करून दिली व मग मी पाणी घेवुन आले, सगळ्यांना वाकून नमस्कार केला, परत आत गेले व पोहे आणि चहा घेऊन आले, गप्पा मारत सगळयांचे खाणे पिणे झाले. (पोहे कोणी केले होते ते आता आठवत नाहीये)

कोणी काही प्रश्न विचारलेच नाहीत. आम्हाला थोडं बोलायला म्हणून गच्चीवर पाठवले, तिथे फक्त मुलाने मला सांगितले की माझ्या घरच्यांना सांभाळावे लागेल, मला ते एकदम सोप्पे वाटले त्यात काय अवघड आहे असा विचार करून मी हो म्हंटले. मी त्याला विचारले की मग मला कोण सांभाळेल? तो महणाला की मी आहे की. झालं आमच्यात एव्हढेच बोलणे झाले. आम्ही खाली आलो. परत नमस्कार झाले व कळवतो नंतर म्हणत ते त्यांच्या घरी गेले. आमची पण चर्चा झाली. मुलगा CA झाला होता, दोन बहिणी नम्र झालेल्या होत्या व एक भाऊ माझ्या हुन एक वर्षाने लहान होता व शिकत होता. मुलगा दिसायला देखणा, कुरळे केस, गोरा, नाक सरळ असा छानच होता फक्त त्या वेळेस त्याने केसांना भरपूर तेल लावले होते (हे माझ्या लक्षात आहे) फक्त तो खुप लांब म्हणजे गुजरात मध्ये राहत होता. मला जर होकार आला तर हो म्हणायचे का असा आता प्रश्न होता. एकतर पुणे सोडून जायचे तेही इतक्या लांब, एकुलती एक लाडकी मुलगी व बहीण सुद्धा. बघू आधी त्यांचे उत्तर तर येवू द्या असा चर्चेचा शेवट झाला.

आला की त्यांच्या कडुन होकार, आता मला व आम्हाला विचार करायचा होता. एकंदर सगळा विचार करता मला कुठेच वावगे वाटले नाही व मी होकार दिला मी पाहिलेला हा पहिलाच मुलगा होता. एवढ्या पटकन माझे लग्र ठरेल असे वाटलेच नव्हते तेव्हा. पण योगायोग असतो म्हणतात ना। तसेच असेल काहीतरी 9 एप्रिल ला साखरपुडा झाला व 22 डिसेंबर ला श्रुती मंगल कार्यालयात लग्न झाले. एप्रिल ते डिसेंबर ह्या मधल्या काळात हे बऱ्याच वेळा पुण्याला आले , त्याच दरम्यान माझ्या मोठ्या भावाचे पण लग्र ठरले, होणारी वाहिनी सदाशिव पेठेतली होती, प्रसिद्ध लेखकाची मुलगी. आम्ही चोघे दोन स्कूटर घेवुन सारसबाग, पर्वती, कात्रज, बाग खुप ठिकाणी फिरायला गेलो, गप्पा मारल्या. माझ्या मोठ्या नणंदेशी चांगली मैत्री झाली माझी. (त्याच ज्या आईला अनुरूप मध्ये भेटल्या होत्या) तेव्हा त्या लायब्ररी चालवत होत्या, आप्पा बळवंत चौकात पुस्तकं घ्यायला यायच्या मी पण अंजु बरोबर काही कामासाठी ABC मध्ये जायची. बऱ्याच वेळा आम्ही भेटायचो त्यांची मुले मला मामी अशी हाक मारायची, तेव्हा गंम्मत वाटायची की आपण एवढ्या लहान वयात मामी झालो. हे सर्व चौतीस वर्षांपूर्वी घडले आहे असे वाटतच नाही.

ह्या सर्व घटना आत्ताच घडल्या आहेत असेच वाटते अजूनही. एका लग्रामुळे खुप नाती मिळाली. ती मी मनापासून जोडली व निभावतीये पण.  आता तर मी एका गोंडस नातीची आजी पण आहे. म्हणतात ना पुणे तेथे काय उणे? लग्राच्या आधी पुण्यात माझ्या माहेरी काहीच उणे नव्हते व आज मी गुजरात मध्ये गेले चौतीस वर्षे आनंद (anand येथे जग प्रसिद्ध अमूल डेअरी आहे) आनंदाने राहतीये. अजुन सुखी संसाराची व्याख्या काय असते?

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती